सर्वांनी वाचवा असा सांगीतिक किस्सा.
साधारण १९४० सालची गोष्ट. लखनऊला ज्येष्ठ गझल गायिका बेगम अख़्तर यांच्या कोठीवर एक माणूस त्यांची गझल ऐकायला आला आहे. एरवी बेगम संध्याकाळी गात पण त्या दिवशी त्या माणसाची उर्दूविषयीची आणि गाण्याविषयीची समज बघून त्या गायला बसतात. ४-५ मिनिटानंतर तो माणूस बेगमच्या हार्मोनियमवर हात ठेवतो, त्यांचं गाणं थांबवतो आणि जाऊ लागतो. बेगम आश्चर्यचकित होऊन विचारतात, ‘‘मुझसे कोई गुस्ताख़ी हुई क्या?’’
त्यावर तो माणूस उत्तरतो, ‘’नाही, तुमचा रिषभ लागलेला मला आता कळला. याचा अर्थ तुमचा ‘सा’ कधीच लागून गेला. तुमचे स्वर हे इतके अद्भूत एकमेकांत मिसळले आहेत. आज मी हजार रुपये घेऊन आलो होतो. कारण माझ्याकडे तेवढेच आहेत. पण तुमच्या एकेका स्वरासाठी लाख रुपये दयावेत असे तुमचे स्वर आहेत. बेगम, मैरी औक़ात नही है की मैं आपका गाना सुनू’’.
हे वाक्य ऐकल्यावर बेगम अख़्तर ढसाढसा रडायला लागल्या आणि त्यानंतर सगळ्या मैफिली रद्द करुन बेगम फक्त त्या माणसासाठी रात्रभर गायल्या. तो माणूस होता रामूभैय्या दाते...दिवंगत ज्येष्ठ भावगीत गायक श्री. अरुण दाते यांचे वडील.
एखादया कलाकाराला याहून देखणी आणि उमदी दाद काय मिळू शकते? भाऊसाहेब पाटणकरांचा शेर या ठिकाणी आठवतोय..
दोस्तहो, मैफल अपुली रंगण्या जर का हवी
आम्हा नको सौजन्य, तुमची ज़िंदादिली नुसती हवी
ऐसे जरी नक्कीच घेऊ तुमच्या मुखाने वाहवा
ती ही अशी, ज्या वाहवाला दयावी अम्ही ही वाहवा...
दाद देणं, कौतुक करणं ही एक कला आहे आणि यासाठी मनाचा मोठेपणाही असावा लागतो. खरं म्हणजे मोकळ्या मनानं एखाद्याचं मनापासून कौतुक करणं हे किती सोपं असायला हवं पण ते तसं असताना दिसत नाही. ओशोंनी म्हटलंय, किसी की निंदा करो तो कोई प्रमाण नही मांगता, पर प्रशंसा करने पर हजार प्रमाण मांगे जाते हैं...एखादया गुणासाठी, यशासाठी, उपलब्धीसाठी सहजतेनं कौतुक करायला पैसे पडत नाही...पण शब्ददारिद्रयाचं काय करावं?
कुठलंही नातं सुदंर करायचं असेल, खोल आणि अर्थगर्भ करायचं असेल तर त्यासाठी एकमेकांना योग्य त्या ठिकाणी ॲप्रिशिएट करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कौतुक झालं तर ऊर्जा मिळते, माणसाचा उत्साह वाढतो, काम करण्याची प्रेरणा मिळते...कौतुक, दाद हे माणसाला अधिक चांगलं सकारात्मक करतात. आणि किती छोटया छोटया गोष्टीचं कौतुक करता येऊ शकतं किंवा करायला हवं..तुमच्याकडे कामासाठी मदतनीस म्हणून येणाऱ्या बाईनं चांगला स्वयंपाक केला, छान भाजी केली आणि तुम्ही लगेच त्या बाईला सांगितलं तर त्यावेळी तीचा चेहरा बघा...केवढे आनंदाचे आणि समाधानाचे भाव दिसतील तीच्या चेहऱ्यावर…एकदा औषधांच्या दुकानात गेले होते, औषधं काढून देणारी बाई इतकी उत्साहानं आणि प्रसन्नतेनं काम करत होती...मी तीला दाद दिली तुम्ही किती प्रसन्न हसता...तीचा चेहरा ही दाद ऐकल्यावर काय उजळून गेला होता..
ज़रा हसकर किसीसे बात करनें में बुरा क्या है
नये रिश्ते बनानें का कोई मौसम नही होता...
ती बाई त्या क्षणी कायमची माझी होऊन गेली...
किती छोटया छोटया गोष्टींची नोंद घेतली जाऊ शकते..आणि घेतल्या जायला हवीसुद्धा...